मोदींचा हट्ट कायम! कोरोनाच्या संकटातही पीएम निवासस्थानाचे बांधकाम सुरूच

नवी दिल्ली : सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा भाग असलेल्या पंतप्रधान निवासस्थानाचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाला पर्यावरणाशी निगडित सर्व प्रकारची मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनामुळे अनेक बाबींवर निर्बंध आहेत. पण लॉकडाऊनसारख्या निर्बंधामुळे बांधकामात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने केंद्र सरकारने सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश केला आहे.

केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखवल्यामुळे प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. विरोधी पक्षांकडून, माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. पण हा विरोध झुगारून एका निश्चित वेळेत नवे संसद भवन व इतर इमारतींचे कार्य पूर्ण करण्यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० डिसेंबर रोजी नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले होते. या प्रकल्पांतर्गत पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत कार्य पूर्ण होणाऱ्या इमारतींमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा समावेश आहे.

या मर्यादीत कालावधीतच पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसपीजीचे मुख्यालय व अधिकाऱ्यांच्या विशेष कॉरिडॉरचे कार्य डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. पंतप्रधानांच्या सध्याच्या शासकीय निवासस्थानाचा पत्ता ७, कल्याण मार्ग असा आहे. उपराष्ट्रपती भवनाचे कार्य पुढील वर्षी ‘मे’पर्यंत पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी तब्बल १३ हजार ४५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सुमारे ४६ हजार लोक या प्रकल्पावर काम करत आहेत.

महत्वाच्या बातम्या