मोदींना जराही लाज असेल तर त्यांनी देशाची माफी मागावी, काँग्रेस-राष्ट्रवादीचा हल्लाबोल

टीम महाराष्ट्र देशा : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या आणि सध्या मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभेच्या जागेवरील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे की, त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने फसविले. मी त्यांना म्हटले होते की तुमचा सर्वनाश होईल आणि ते आपल्या कर्मांने मेले. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. तर साध्वी यांच्या या वक्तव्याचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने निषेध केला असून मोदींना जराही लाज असेल तर त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

गांधी भवन येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त पत्रकार परिषदे मध्ये ही मागणी करण्यात आली आहे.यावेळी पत्रकार परिषदेमध्ये कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक होते. यावेळी बोलताना सचिन सावंत म्हणाले की, प्रज्ञा सिंह यांनी महाराष्ट्राचे महान वीरपुत्र शहीद हेमंत करकरे यांचा अवमान केला आहे. हा फक्त करकरेंचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि शहीदांचा अवमान आहे.शहीदांच्या शौर्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करणा-या पंतप्रधान मोदी आणि भाजपने तात्काळ माफी मागावी आणि प्रज्ञा ठाकूर यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी अद्याप साधा निषेधही केला नाही असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

तर नवाब मलिक म्हणाले की, भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देवून दहशतवादाला समर्थन दिले आहे हे स्पष्ट होत असून साध्वीच्या रुपाने भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे. भाजप दहशतवाद्यांशी लढत असल्याचे ढोंग करत आहे हे स्पष्ट असून भाजपचा खरा चेहरा उघडा पडला आहे. असे मलिक यावेळी म्हणाले.Loading…
Loading...