‘मोदींनी सरकारी कंपन्या, सरकारी मालमत्ता विकून कारभार हाकण्याचे काम केले’

prithviraj chavan

कराड : केंद्र सरकारने गॅस, पेट्रोल, डिझेल या इंधनांच्या केलेल्या दरवाढीविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आंदोलन पुकारले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेले आदी जीवनावश्यक वस्तू महागल्या असून आता या मुद्द्यावरून कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. केंद्रातील मोदी सरकारने निर्माण केलेल्या कृत्रिम महागाई विरोधात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली दहा दिवसांचे राज्यव्यापीआंदोलन करण्यात येत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात सायकल रॅली काढण्यात आली. कराडमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलताना म्हणाले कि, ‘केंद्र सरकारने सरकारी कंपन्या, सरकारी मालमत्ता विकून कारभार हाकण्याचं काम सुरु ठेवलं आहे. देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झालेली आहे. देश चालवण्यात मोदी सरकारची अक्षम्य चूक झाली आहे. त्यामुळे आता सामान्य माणसावर पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीचा बोजा टाकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडं मोडलं असल्याची घणाघाती टीका चव्हाण यांनी केली आहे.

मनमोहनसिंग यांचे सरकार असताना 124 डॉलर प्रति बॅरलप्रमाणे कच्च्या तेलाचे दर होते. सध्या कच्च्या तेलाचे दर 60 ते 65 डॉलर प्रती बॅरल असे दर असतानाही पेट्रोल डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकार सामान्य लोकांवर कर लादून स्वतःच्या झोळ्या भरण्याचं काम करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी मोदी सरकारवर केला आहे. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी ‘मोदी हटाव देश बचाव’ असा नारा देऊन परिसर दुमदुमवून टाकला होता.

महत्त्वाच्या बातम्या

IMP