fbpx

मॉब लिंचिंग प्रकरणी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला खेद, म्हणाले…

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत भाषण केले. यावेळी झारखंडमध्ये झालेल्या मॉब लिंचिंग प्रकरणी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेद व्यक्त केला आहे. राजकारण करून परिस्थिती बदलणार नाही. त्यामुळे अपराध्यांना संविधान आणि न्यायदेवता योग्य ती शिक्षा देईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत विश्वास व्यक्त केला आहे.

यावेळी मोदींनी विरोधकांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. तर देशात प्रचंड बहुमताने दुसऱ्यांदा हे सरकार सत्तेत आणण्यासाठी जनतेने जो विश्वास दाखवला आहे. त्या जनतेचे मी आभार मानतो, असे मोदींनी प्रतिपादन केले. तर मिडिया आणि ईव्हीएमच्या मुद्यावरून कॉंग्रेसला चांगलेच टोले मारले.

विरोधकांकडून भाजप सत्तेवर आल्यावर देश हरला असे वक्तव्य करण्यात आले होते. मग त्या नियमानुसार वायनाडमध्ये भारत हरला का? रायबरेलीमध्ये भारत हरला का? मग काँग्रेस हरल्यावर देश हरला कसं म्हणता? असा  सवाल पंतप्रधान मोदींनी केला. तर  जे लोक निवडणुकीच्या मैदानात उतरले नाही अशांनी या सभागृहात राग व्यक्त केला. खूप वर्षानंतर देशात बहुमताने सरकार आलं आहे. जगात सर्वात मोठी लोकशाही भारतात आहे. निवडणुकीला एक वेगळं महत्व असतं. या निवडणुकीत पराभव झाला म्हणून देश निवडणूक हरला असं म्हणणं म्हणजे लोकशाहीचा अपमान केल्यासारखे आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

मीडियामुळे आम्ही जिंकलो असे विरोधकांकडून सांगण्यात येते. ज्या राज्यात आमचं सरकार नाही तिथेही हे लागू होणार का? तामिळनाडू आणि केरळमध्ये हे लागू होणार का? असा प्रश्न मोदींनी यावेळी उपस्थित केला. तर ईव्हीएमच्या मुद्यावरूनही मोदींनी विरोधकांना शालजोडे मारले.

मोदी म्हणाले की, निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ईव्हीएमवर खूप चर्चा झाली. अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. जेव्हा आमचे सभागृहात फक्त २ सदस्य निवडून आले होते तेव्हा आमची खिल्ली उडवली गेली. मात्र कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आम्ही पक्ष पुन्हा उभा केला. आम्ही कधी ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडलं नाही. कधी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले नाहीत. ज्यांना स्वत:वर विश्वास असतो ते बहाणे शोधत नाहीत, असे मोदी म्हणाले.