उर्मिला मातोंडकरांच्या प्रचारसभेत ‘मोदी-मोदी’च्या घोषणा

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारसभेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ च्या घोषणा दिल्या. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद निवळला.

उर्मिला मातोंडकर या उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टींच्या विरोधात जोरदार प्रचार करत आहेत. सकाळी उर्मिला मातोंडकर या बोरीवली स्थानकाबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. मात्र, तिथे आधीच भाजपचे कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला मातोंडकर या बोरीवली रेल्वे स्थानकाबाहेर पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

त्यामुळे चिडलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते परंतु पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमधील वाद निवळला.