केवळ मोदींच्या भाषणाने लोकांची पोटं भरणार नाहीत – सोनिया गांधी

सोनिया गांधी

बंगरुळु – कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, आरोप – प्रत्यारोपाचे राजकारण रंगतांना दिसत आहे. दरम्यान आज सोनिया गांधी यांनी कर्नाटकातील विजापूर येथील प्रचार सभेत मोदींवर घणाघाती टीका केली.

यावेळी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, मोदीजींचे वक्तृत्व चांगले आहे, ते एखाद्या अभिनेत्याप्रमाणे बोलतात. जर त्यांच्या भाषणाने देशातील भुकेल्यांची भूक शमू शकली तर मी नक्कीच आनंद व्यक्त करेन, पण केवळ भाषणाने रिकामी पोटं भरत नाहीत त्यासाठी अन्न आणि रोजगाराची गरज असते, अशा शब्दांत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

ज्यावेळी सर्व राज्ये दुष्काळाने होरपळत होती तेव्हा केंद्र सरकारने त्यांना दिलासा देणे गरजेचे होते. कर्नाटकातील शेतकरीही दुष्काळाने होरपळे होते. त्यावेळी मदतीसाठी तुमचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पंतप्रधानांची भेट घ्यायची होती मात्र, मोदींनी भेट नाकारली. या कृतीद्वारे मोदींनी केवळ शेतकऱ्यांचीच नव्हे तर कर्नाटकचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे काँग्रेस सरकारने कर्नाटकातील शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही, हे म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हाच का तुमचा ‘सबका साथ, सबका विकास’ ? असा प्रश्न आपल्याला मोदींना विचारावासा वाटतो, असे सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या.