fbpx

नोटाबंदीमुळे गरिबांचा पैसा श्रीमंतांच्या हातात- ममता बॅनर्जी

ढिसाळ नियोजन आणि भ्रष्टाचाऱ्यांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी विविध पळवाटा काढल्याने नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला असून, मोदींनी मागितलेली 50 दिवसांची मुदत संपत आली तरी देशातील परिस्थिती सुधरलेली नाही, असे टीका विरोधी पक्षांनी आज मोदी सरकारवर सोडले. आज दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि तृणमूलसह अन्य विरोधी पक्षांनी नोटाबंदीवरून केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. सरकारच्या या निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांचे काहीच नुकसान झाले नाही. देशातील गोरगरीब आणि शेतकऱ्यांना मात्र या निर्णयामुळे त्रास होत आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी आज केला.

या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह राजद आणि डीएमकेचे नेते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधींनी मोदीविरोधात टीका केली, ते म्हणाले,  “नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला आहे. 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या या निर्णयानंतर काळा पैसा बाळगणाऱ्यांनी अनेक पळवाटा काढून काळ्याचे पांढरे करून घेतले. मात्र नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढली, गरीब शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे” यावेळी सहारा आणि बिर्लांकडून मिळालेल्या पैशांवरून मोदींविरोधात पुन्हा निशाणा साधत राहुल यांनी पंतप्रधानांनी या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली.

नोटाबंदीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत, मोदींनी अच्छे दिन आणण्याचे वचन दिले होते. ते हेच अच्छे दिन का?’ नोटाबंदीमुळे देश 20 वर्षे मागे गेला असून,  गोरगरीब जनता उपाशीपोटी राहिली तरी नोटाबंदीचा निर्णय मागे घेण्यात आला नाही, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे . मोदी सरकार कॅशलेसवरून बेसलेस झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.