जातीवादाचे प्रदूषण दूर करून भारत स्वच्छ आणि सुंदर करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न – आठवले

टीम महाराष्ट्र देशा : देशात ज्यांच्या मनात जातीभेदाचा अमंगल विचार आहे तो दूर करायचा आहे. समाजातून जातीभेद दूर करून देश खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि सुंदर करायचा आहे असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. सध्या आठवले चंदीगडच्या दौर्यावर आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत सरकार मध्ये दुसऱ्यांदा केंद्रिय राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल चंदीगड येथील धानस कॉलनी येथे रिपब्लिकन पक्षातर्फे रामदास आठवलेंचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना आठवले बोलत होते.

पुढे बोलताना, ‘जातीवाद संपविण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देऊन त्यांना संरक्षण देण्याची सरकारची जबाबदारी आहे. ज्या जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे त्यांचे सरकार जरूर संरक्षण करील. देशातून जातीवादाचे प्रदूषण दूर करून सामाजिक स्वास्थ्य चांगले करण्याचा तसेच जातीवाद नष्ट करून भारत स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न आहे’ असही आठवले यावेळी म्हणाले.

दरवर्षी देशात ६० ते ७० हजार लोक आंतरजातीय विवाह करतात आपल्याकडे सामाजिक न्याय मंत्रालय हे खाते असले तरी समाजातील प्रत्येक अन्यायग्रस्ताला न्याय देण्यासाठी आपण तत्पर असल्याची माहिती आठवलेंनी यावेळी दिली.