मोदी सरकारचा मोठा निर्णय; गर्भपाताची मर्यादा आता 20 आठवड्यांवरुन वाढवून 24 आठवडे  केली

मोदी सरकारचा मोठा निर्णय; गर्भपाताची मर्यादा आता 20 आठवड्यांवरुन वाढवून 24 आठवडे  केली

नवी दिल्ली- काही विशिष्ठ श्रेणीतील महिलांसाठी गर्भपाताची मर्यादा आता 20 आठवड्यावरुन वाढवून 24 आठवडे करण्यात आली आहे.याबाबतची नविन नियमावलीची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. या श्रेणींत बलात्कारीत अथवा अन्याय झालेल्या महिला, अल्पवयीन मुली, गर्भधारणा असताना वैवाहिक स्थितीमध्ये बदल झालेल्या महिला यांचा या श्रेणीत सहभाग करण्यात आला आहे.

वैद्यकीय गर्भपाताच्या संदर्भातील सुधारणा नियम 2021 नुसार या श्रेणीतील महिलेच्या प्रकृतीच्या सुरक्षिततेची खात्री तसंच अर्भकाची स्थिती किंवा मुल जन्माला येणार असेल तर त्यात काही विकृती आहे का याबाबतची खात्री केल्यानंतर गर्भपात करायचा की नाही यासंदर्भातील निर्णय संबंधित वैद्यकीय तज्ञ घेतील असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

नवीन नियमानुसार, मानसिकदृष्ट्या आजारी महिला, गर्भाला कोणतीही विकृती किंवा आजार असणं ज्यामुळे मुलाचं किंवा होणाऱ्या आईचं जीवन धोक्यात येण्याची शक्यता असते किंवा जन्मानंतर अशा मानसिक किंवा शारीरिक विकृतीची शक्यता असते, गंभीर अपंगत्व येण्याची शक्यता असते, गर्भवती महिला मानवी संकट क्षेत्र किंवा आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीत असल्यास त्यांना या श्रेणीत समाविष्ट केल्याचं सरकारने घोषित केले. हे नवे नियम मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (सुधारणा) विधेयक, 2021 अंतर्गत अधिसूचित करण्यात आले आहेत. हे विधेयक मार्चमध्ये संसदेत पारित झाले होते.

24 आठवड्यानंतर (सहा महिने) गर्भपाताबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य-स्तरीय वैद्यकीय मंडळ स्थापन केलं जाईल.जर एखादी महिला गर्भपाताची विनंती घेऊन आली, तर तिचं आणि तिच्या अहवालाचं परीक्षण करणं आणि अर्ज प्राप्त झाल्याच्या तीन दिवसांच्या आत गर्भपाताला परवानगी द्यायची की नाही, याबाबत निर्णय देणं हे या वैद्यकीय मंडळाचं काम असेल. मंडळानं गर्भपात करण्यास परवानगी दिली तर, अर्ज मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत संपूर्ण प्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण होईल आणि महिलेचे योग्य समुपदेशन केले जाईल, याचीही काळजी घेण्याचं काम या मंडळाचं असेल.

महत्त्वाच्या बातम्या