मोदी सरकार हे आजवरचे सर्वात भ्रष्ट सरकार – पृथ्वीराज चव्हाण

कारण नसताना बुलेट ट्रेन महाराष्ट्राच्या माथी मारली जातेय

पुणे: सध्याचे भाजप सरकार हे देशाच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पुण्यामध्ये आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. मोदी सरकारच्या काळामधील सर्वात मोठा भ्रष्ट्राचार हा राफेल विमान खरेदी असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली. यावेळी व्यासपिठावर स्वपक्ष भाजपवर नाराज असणारे खासदार शत्रुघ्न सिंन्हा, काँग्रेसचे नवनियुक्त खासदार कुमार केतकर, वसंतदादा सेवा संस्थेचे संजय बालगुडे उपस्थित होते.

निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी मोठमोठी आश्वासने दिली मात्र, ती पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. काँग्रेसवर भ्रष्ट्राचाराचे खोटे आरोप करत भाजप सत्तेवर आले. यामध्ये काही जातीयवादी अधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिल्याचा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. राफेल खरेदीत प्रत्येक विमानामागे एक हजार कोटींची किंमत वाढवली गेली. म्हणजे छत्तीस विमानांसाठी तब्बल 36 हजार कोटी रुपये कुठे गेले याच ऊत्तर सरकारला द्यावं लागणार आहे. आज गुगलवर जरी राफेल विमान म्हणून सर्च केले तरी सगळे समोर येत असल्याचही ते म्हणाले.

पंतप्रधान देशाचे की गुजरातचे

महाराष्ट्र अथवा मुंबईच्या लोकांनी बुलेट ट्रेन पाहिजे असल्याचं सांगितलं नाही, तरी मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन केली जातेय. मुळात पंतप्रधान देशाचे आहेत का गुजरातचे हेच कळत नसल्याची टीका चव्हाण यांनी केली. तसेच एका देशाने दुसऱ्या देशाला दिलेली ही जगातील सर्वात महागडी ऑर्डर आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून कोणतंही कारण नसताना महाराष्ट्राच्या माथी प्रकल्प मारला जात असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.

You might also like
Comments
Loading...