मोदींनी पाकिस्तानला धुडकावले, किरगिझस्तानला मध्य आशियाईतून जाणार

टीम महाराष्ट्र देशा : किरगिझस्तानमधल्या बिश्केकमध्ये शांघाय को- ऑपरेशन ऑर्गनायझेशनची (SCO) बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जाणार आहेत. त्यामुळे किरगिझस्तानला जाण्यासाठी भारताकडून जवळ पडणाऱ्या हवाई मार्गांची चाचपणी चालू होती. त्यात दोन मार्गांचा समावेश होता.एक मार्ग पाकिस्तानच्या हद्दीतून जाणारा होता. तर दुसरा मार्ग मध्य आशियाई देशावरून जाणारा होता. त्यामुळे भारताने पाकिस्तानवरून जाणारा हवाई मार्ग टाळला आहे, अशी माहिती परराष्ट्र विभागाकडून मिळत आहे.

१३-१४ जून रोजी किरगिझस्तानच्या बिश्केक येथे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन(SCO) कडून शिखर संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. १३ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी बिश्केकला रवाना होतील. सुरुवातीला अशी बातमी आली होती की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करत बिश्केकला जातील. यासाठी पाकिस्ताननेही नरेंद्र मोदी यांच्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून जाण्यासाठी परवानगी दिली होती मात्र भारताने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बिश्केकला जाताना आता मोदींच विमान हे ओमान, इराण आणि मध्य आशियाई देशांवरून जाणार आहे. ओमान मार्गाने जास्त वेळ लागणार आहे. मोदी जर पाकिस्तानच्या हद्दीतून गेले असते तर त्यांना बिश्केक येथे पोहचण्यास तुलनेने कमी वेळ लागला असता. तरी देखील भारताने पाकिस्तानचा हवाई मार्ग धुडकावला आहे. त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताकडून धुडकावण्यात आले आहे.