fbpx

८३ हजार किलोमीटरच्या रस्ते निर्मितीच्या कामाला मंजुरी

highway

टीम महाराष्ट्र देशा :केंद्रीय मंत्रिमंडळाने ८३ हजार किलोमीटरच्या रस्ते निर्मितीच्या कामाला मंजुरी दिली आहे असून यासाठी सरकार ६.९ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये हे रस्ते बांधण्यात येणार आहेत यामध्ये ‘भारतमाला महामार्ग प्रकल्पा’चाही समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत देशाच्या सीमेवर २८,४०० किलोमीटरचे महामार्ग तयार करण्यात येणार आहेत.

महामार्ग प्रकल्पासाठी नितीन गडकरी यांच्या रस्ते व वाहतूक मंत्री मंत्रालयाने काही महिन्यांपूर्वी प्रस्ताव दिला होता. ५ वर्षांमध्ये पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पासाठी ६.९२ लाख कोटींचा निधी आवश्यक असल्याचे रस्ते व वाहतूक मंत्री मंत्रालयाने प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. अखेर या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने देशभरातील रस्त्यांचे जाळे विस्तारणार आहे.

देशाचे विविध भाग रस्त्यांनी जोडले जावे, वाहतुकीचा वेग वाढावा, या उद्देशाने ८३ हजार किलोमीटरचे महामार्ग बांधले जाणार आहेत. या महामार्गांचे काम पूर्ण झाल्यावर देशात रस्त्यांचे जाळे तयार होऊन त्याचा मोठा फायदा माल वाहतुकीला होईल. ‘दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यामुळे माल वाहतुकीसाठी येणारा खर्च कमी व्हावा, हा नव्या महामार्ग प्रकल्पामागील हेतू आहे,’ असे सरकारच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. रस्त्यांचे जाळे विस्तारल्यास आणि टोल यंत्रणा अत्याधुनिक केल्यास वाहतुकीचा चेहरामोहरा बदलेल, असा आशावाद प्रस्तावातून व्यक्त करण्यात आला आहे.सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा असणार आहे.