fbpx

मोदींनी दाऊदऐवजी पाकिस्तानी साखर आणलीः अशोक चव्हाण

ashok chawan , narendra modi and dawwod

मुंबई – देशात आणि राज्यात यावर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामातील साखर मोठ्या विक्रीविना पडून आहे. तरीही सरकारने पाकिस्तानातून लाखो टन साखर आयात केली आहे. यामुळे साखरेचे दर कोसळणार असून याचा फटका साखर उद्योगासह ऊस उत्पादक शेतक-यांना बसणार आहे. पाकिस्तानातून कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याचे आश्वासन देणा-या मोदींनी दाऊदऐवजी पाकिस्तानची साखर भारतात आणली अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.

मुंबईतील गांधीभवन येथे ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगा समोरील अडचणी संदर्भात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारपरिषदेला संबोधित करताना खा. चव्हाण म्हणाले की,देशात यावर्षी 250 मेट्रीक टन साखरेचे उत्पादन होईल असा सरकारचा अंदाज होता मात्र प्रत्यक्षात यावर्षी 320 मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामातील साखर मोठ्या प्रमाणात गोडाऊनमध्ये पडून आहे. यामुळे गेल्यावर्षी 40 – 42 रुपये प्रति किलो असणारे साखरेचे दर आता 25 – 26 प्रति किलो रुपयांवर आले आहेत. दरातील घसरणीमुळे साखर उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. पुढच्या वर्षी सुध्दा मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे त्यामुळे सरकारने पुढच्या तीन वर्षासाठी साखर उद्योगासाठी धोरण तयार करावे ज्यात साखरेच्या निर्यातीला प्रोत्साहन द्यावे. राज्य सरकारने 50 लाख टन साखरेचा बफर स्टॉक निर्माण करावा त्याचबरोबर व्याजाची प्रतिपूर्ती, साठवणूक शुल्क, विमा हप्ता आणि रखरखाव खर्च याची तरतूद करावी, इथेनॉलच्या किंमती वाढवाव्यात असे खा. चव्हाण म्हणाले.

पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेचे दर देशातील आणि राज्यातील साखरेच्या दरांपेक्षा प्रति किलो एक रुपयाने कमी आहेत. त्यामुळे साखरेचे दर मोठ्या प्रमाणात घसरणार असून याचा मोठा फटका साखर कारखान्यांसोबतच ऊस उत्पादक शेतक-यांना बसणार आहे. पाकिस्तानला त्यांच्या भाषेतच उत्तर द्या, लव्ह लेटर लिहीणे बंद करा असे म्हणणारे व सरकारच्या विरोधात कोणी काही बोलले की पाकिस्तानात जा म्हणणा-यांना पाकिस्तानचा एवढा पुळका का आलाय? शिवसेनेला पाकिस्तानी कलाकार चालत नाहीत मग साखर कशी चालते? असा सवाल करून पाकिस्तानातून एक रूपये किलो स्वस्त असणारी साखर आयात करून सरकार देशातल्या ऊस उत्पादक शेत-यांवर अन्याय करित आहे. पाकिस्तान प्रेमापोटी देश आणि राज्यातील शेतक-यांवर भाजप सरकारवर अन्याय करित असून सरकारने तात्काळ साखरेच्या आयातीवर बंदी घालावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.

4 Comments

Click here to post a comment