मॉडेल संगिता चॅटर्जीचा तुरूंगात आत्महत्येचा प्रयत्न

तिरुपती : रक्तचंदनाच्या तस्करी प्रकरणात शिक्षा भोगत असलेली मॉडेल संगिता चॅटर्जी हिने आज तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केला. वैफल्यामुळे तिने तुरुंगातील स्वच्छतागृहात ठेवलेले फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर तिला तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

रक्तचंदनाची तस्करी केल्याप्रकरणी संगिता हिला मार्च २०१७ मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर तिची आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. कुख्यात चंदन तस्कर एम. लक्ष्मण याची संगिता ही दुसरी पत्नी  असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्यावर देशातील सहा राज्यांमध्ये रक्तचंदनाची तस्करी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.