‘विकास बरोबर प्रकाश गायब’; लोडशेडिंग विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे ‘मोबाईल टॉर्च ‘ आंदोलन

राज्यसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

पुणे : ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यभरातील जनतेला भारनियमनाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील भार नियमनाच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात रास्ता पेठ येथील महावितरण कार्यालयासमोर ‘मोबाईल टॉर्च ‘ लावून निदर्शने केली. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आजच्या आंदोलनात राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे सणासुदीच्या दिवसात नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना भार नियमनामुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज हे आंदोलन केलं. ‘विकास बरोबर प्रकाश गायब’ सारख्या फलकांनी यावेळी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. तर यावेळी आंदोलकांनी कोळशाची टोपली महावितरण अधिकाऱ्यांना भेट दिली.

यावेळी पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेवक सुभाष जगताप, महिला आघाडी अध्यक्ष रूपाली चाकणकर, युवक शहराध्यक्ष राकेश कामठे, युवती शहराध्यकक्षा मनाली भिलारे आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते