मोबाईल हिसकावणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

औरंगाबाद : तरुणाचा मोबाईल हिसकावणा-या चोराला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. उमेश महेश गवळी (१९, रा. मुकुंदवाडी) असे मोबाईल चोराचे नाव आहे. त्याला मुकुंदवाडीतील संतोषीमातानगराजवळ गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले. अखिलेश रामदास खरात (२५, रा. गुलमोहर कॉलनी, एन-५, सिडको) हा २० फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मित्र आकाश कांबळे असे दोघे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते.

कार्यक्रम आटोपून दुचाकीने घराकडे जात असताना त्यांना उमेश गवळी याने लेमन ट्री हॉटेल ते हॉटेल ग्रँड कैलास रोडवरील पेट्रोल पंपाजवळ अडवले होते. त्यावेळी अखिलेश खरातच्या हातातील पंधरा हजारांचा मोबाईल हिसकावून गवळीने पळ काढला होता. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुकुंदवाडी भागातील संतोषीमातानगरात मोबाईल हिसकावणारा उमेश गवळी असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. त्यावरुन गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक अविनाश आधाव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शिवाजी झिने, पोलीस नाईक राजेंद्र साळुंके, विठ्ठल सुरे, शिपाई प्रभाकर राऊत, नितीन देशमुख यांनी सापळा रचून उमेश गवळीला पकडले. त्याच्याकडून पंधरा हजाराचा मोबाईल हस्तगत केला.

महत्वाच्या बातम्या