जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणावरून मनसेतील मतभिन्नता चव्हाट्यावर

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट गडद होत असताना दुसरीकडे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणामुळे राजकीय वातावरणही ढवळून निघाल आहे. मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने राज्यभरात या चर्चेला उधान आले आहे. त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले असून विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारवरच निशाणा साधला आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीच्या प्रकरणावर काही जणांनी पाठिंबा दिला आहे, तर काही लोकांनी या कृत्याचा विरोध दर्शविला आहे. एकीकडे मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी देखील जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीचं समर्थन केले. परंतु मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी घडलेल्या या सर्व प्रकरणाचा विरोध केला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणावरून मनसेतच मनभिन्नता असल्याचे दिसून येत आहे.

कीर्तिकुमार शिंदे ट्विट करत म्हणाले की, सोशल मीडियावरचं मत पटलं नाही म्हणून ठाण्यातील अनंत करमुसे यांना अमानुष मारहाण करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा धिक्कार करणं गरजेचं आहे. संचारबंदीच्या काळात हे कृत्य केल्यामुळे मग्रूर आव्हाडाच्या चेहऱ्यावरचा ‘संविधानवादा’चा बुरखा फाटला आहे. जितेंद्र आव्हाडांवर त्वरित कारवाई व्हायला हवी, अशी मागणी कीर्तिकुमार शिंदे यांनी केली आहे.

तर, दुसरीकडे मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करुन जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीचं समर्थन केलं आहे. मंत्री, कलाकार किंवा कोणत्याही एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी यांनी केलेल्या पोस्टवर विकृत पणे कमेंट करु नये. तसेच विकृतीची कमेंट केलीच तर विकृतीप्रमाणे मार खावा असं रुपाली पाटील यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत जी काही विकृत पोस्ट केली म्हणून त्याला मारहाण केली असेल तर हे चांगलेच केले. विकृतपणे कमेंट करणाऱ्यांना ठेचलेच पाहिजे असं रुपाली पाटील यांनी फेसबुकद्वारे सांगितले आहे. रुपाली पाटील यांनी थोड्या वेळानंतर ही पोस्ट फेसबुकवरुन डिलीट केली असल्याचे समोर आले.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड या सर्व प्रकरणावर म्हणाले की, माझ्या विरोधात गेली 3 वर्षे हा अभियंता नको नको त्या पोस्ट करतो आहे. मला माझे कार्यकर्ते याबाबत अनेकदा सांगायचे पण मी याकडे दुर्लक्ष केले. मी गेले २४ तास माझ्या मतदारसंघात आणि सोलापूर जिल्हयातील कामात व्यस्त आहे. या अभियंत्याला मारहाण झाल्याचा सर्व प्रकार मला सोशल मीडियाद्वारे समजला असल्याचे प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.