राज ठाकरेंची पुण्यात बैठक, पदाधिकाऱ्यांचे मोबाईल गेटवरच काढले

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत, आगामी रणनीतीवर बैठकीत चर्चा केली जाणार आहे. दरम्यान बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांना मोबाईल आणण्यास मनाई करण्यात आली आहे, पदाधिकाऱ्यांचे मोबाईल बैठक सुरु असणाऱ्या क्लब हाऊसच्या गेटवर जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे मनसेच्या या बैठकीत गुप्त चर्चा होणार असल्याचं दिसत आहे.

मनसेच्या स्थापनेपासून साथ देणाऱ्या पुणे शहरात आगामी वाटचाल ठरवण्यासाठी राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत. पुण्यातील सर्व गटअध्यक्ष आणि शाखाध्यक्षांच्या बैठका सध्या सुरु आहे. पुण्यानंतर राज ठाकरे नाशिकचाही दौरा करणार असल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला साथ दिल्याचे दिसून आले, मात्र आता आघाडीकडून मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात काही वेगळी समीकरणं पाहायला मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.