मनसे नाशिकमध्ये पुन्हा सक्रीय, सर्व जागांवर निवडणूक लढवणार

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष विधानसभेला नाशिक जिल्ह्यातील सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहे. मागच्या निवडणुकीतील पराभवाचा अनुभव घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर आता विजय संपादन करण्यासाठीच निवडणुकीत उतरणार असल्याचा दावा मनसे प्रवक्ते अभिजित पानसे यांनी केला आहे.

आज मनसेची नाशिक येथील पक्ष कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. यावेळी संदीप देशपांडे, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, मनोज घोडके, सुजाता डेरे, अर्चना जाधव, भानुमती अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अभिजित पानसे यांनी भाजप – शिवसेना सरकारवर चांगलीच टोलेबाजी केली. तर भाजप सेना सरकारने केवळ उद्घाटने केली बाकी काही केले नाही असा टोला पानसे यांनी लगावला.

पानसे म्हणाले की, ज्यातील भाजपा-शिवसेना सरकारवर ताशेरे ओढले. या सरकारने केवळ भूमिपूजने आणि घोषणा करण्यातच त्यांचा सगळा काळ खर्च केला. हे केवळ बोलघेवडे सरकार असून, त्यांनी सामान्यांच्या समस्यांमध्ये भर घालण्याचेच काम केले. त्यामुळे आता जनतेला सत्य सांगण्याची वेळ आली आहे. घरोघरी जाऊन प्रचार करून मनसेला जिंकायचे आहे, असा निर्धार पानसे यांनी व्यक्त केला.

दरम्यान मनसे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत चर्चा सुरु होती. मात्र मनसे नाशिक मध्ये निवडणूक लढवणार असल्याच पक्क झालं आहे. त्यामुळे युती – आघाडीच्या नेत्यांना पुन्हा मनसेच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.मात्र मनसेचा रोष हा भाजप सेनेकडे असल्याने आघडीपेक्षा मनसेचा फटका हा युतीला बसणार आहे.