आम्ही समंजस, सहनशील आहोत म्हणजे आम्ही दुर्बल नाही – मनसे

टायगर विरुद्ध देवा वादात मनसेची उडी

टीम महाराष्ट्र देशा- येत्या २२ डिसेंबर रोजी इनोव्हेटिव्ह फिल्म्सचा “देवा” हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे मात्र नेमक्या याच दिवशी अभिनेता सलमान खानची मुख्य भूमिका असलेला टायगर जिंदा है हा देखील हिंदी सिनेमा प्रदर्शित होत असल्याने “चित्रपटगृह उपलब्ध नाही” असे ठोकळेबाज उत्तर निर्मात्यांना प्रत्येक ठिकाणी मिळत आहे.’देवा’च्या समर्थनार्थ आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना उतरली असून टायगर च्या हिंदी निर्मात्याने आपल्या नावाचा, बळाचा धाक दाखवून सर्वच्या सर्व चित्रपटगृहांवर कब्जा केला आहे अशा प्रकारचा आरोप एका सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या पोस्ट मधून करण्यात आलेला आहे .

Deva-Ek-Atrangee-Marathi-Movie poster
Deva-Ek-Atrangee-Marathi-Movie poster

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या नावाने हि पोस्ट तयार करण्यात आली आहे .व्हायरल होत असलेली हि पोस्ट अधिकृत आहे कि नाही याची खात्री करण्यासाठी ‘महाराष्ट्र देशा’ने खोपकर यांच्याशी संपर्क करण्याचा देखील प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही .

tiger-zinda hai

व्हायरल झालेली पोस्ट जशीच्या तशी

प्रती,
व्यवस्थापक

आपण आपले चित्रपटगृह महाराष्ट्राच्या भूमीत चालवता ह्याचा आपल्याला विसर पडला असावा म्हणून हे स्मरणपत्र. हे लिहिताना आम्ही आमच्या भावनांवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु त्या आपल्या एका कृतीमुळे अतिशय दुखावल्या गेल्या आहेत.

दिनांक २२ डिसेंबर रोजी इनोव्हेटिव्ह फिल्म्सचा “देवा” हा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्याचा अथक प्रयत्न चालू आहे. पण “चित्रपटगृह उपलब्ध नाही” असे ठोकळेबाज उत्तर त्याला प्रत्येक ठिकाणी मिळत आहे. कारण का ? तर त्या दिवशी “टायगर जिंदा है” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि त्या हिंदी निर्मात्याने आपल्या नावाचा, बळाचा धाक दाखवून सर्वच्या सर्व चित्रपटगृहांवर कब्जा केला आहे. पण मग बाकी निर्मात्यांनी काय करायचे ? कुठे जायचे ? ही अशी मोनॉपोली जर हिंदी निर्माते करणार असतील तर मराठी निर्मात्यांनी काय करायचे ? दुसऱ्या कुठल्या गैरहिंदी राज्यात ही अशी दादागिरी सहन केली जाईल ? एकदा दक्षिणेच्या कुठल्याही राज्यात असे धाडस करून बघा. पार्श्वभागावर लाथ मारून बाहेर काढतील, हाकलून देतील, मग ह्या महाराष्ट्रातच मराठीची ही गळचेपी का होते आहे ? ह्याला जबादार असणाऱ्या अनेक घटकांपैकी तुम्ही एक आहात हे ध्यानात घ्या. येणाऱ्या सर्व चित्रपटांना संधी देणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुमची चित्रपटगृहे हिंदीची बटीक नाहीत.सर्वभाषिक प्रेक्षकांना आणि विशेषतः मराठी प्रेक्षकांना अग्रक्रमाने सेवा देण्यासाठी तुम्ही आहात. तुम्ही म्हणाल की हा आमचा प्रश्न आहे, आम्ही हवे ते करू. तर मग नीट ऐका. महाराष्ट्राची अस्मिता जपणे आणि मराठी चित्रपटांना त्यांचे हक्क मिळवून देणे हा आमचा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी जे हवे ते आम्ही करू. आम्ही समंजस आहोत, सहनशील आहोत म्हणजे आम्ही दुर्बल आहोत असा गैरसमज तुम्ही करून घेतला असेल तर तो दुर्दैवी आहे. कदाचित साहेबाच्या भाषेत सांगितले तर तुम्हाला जास्त पटेल – Live and let live . स्वतः जागा आणि दुसऱ्याला जगू द्या. त्यात दोघांचेही हित आहे. आणि ह्या दोन्ही भाषा तुम्हाला समजत नसतील तर मग आम्हाला आमच्या “खास” भाषेत तुम्हाला समजावून सांगायला लागेल. तेव्हा तुटेल एवढे ताणू नका.

आमची नम्र विनंती आहे की २२ डिसेम्बरला इनोव्हेटिव्ह फिल्म्सच्या “देवा” ह्या मराठी चित्रपटाला आपल्या चित्रपटगृहात प्राईम टाईममध्ये खेळ मिळालाच पाहीजे.

आपला नम्र
अमेय विनोद खोपकर
अध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना

You might also like
Comments
Loading...