राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत मनसे कोर्टात जाणार ? गृहमंत्र्यांच्या चर्चेनंतर नांदगावकर म्हणाले…

raj thakrey

नागपूर : राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये राज्यातील काही प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेत कपात तर काहींना नव्याने सुरक्षा देण्याचा र्निणय घेतला होता. भाजपमधील अनेक बड्या नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत देखील कपात केल्याचे समोर आले होते.

राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा होती. मात्र, आता त्याऐवजी त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर मनसेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती. तर, मनसेने स्वतःच्या सुरक्षा रक्षकांची देखील टीम तयार केली. मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांची नागपूर येथे भेट घेतली.

यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत देखील चर्चा केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘सरकारने राज ठाकरे यांच्या सुरक्षेत आता एक कमांडो वाढविला आहे. मात्र राज ठाकरे यांना असलेला धोका बघता सरकारने सुरक्षेचा योग्य निर्णय घ्यावा. आम्हाला त्या संदर्भात कोर्टात जाण्याची आवश्यकता वाटत नाही. तर आम्हीसुद्धा त्यांच्या सुरक्षेसाठी तयारी केली आहे, असं देखील नांदगावकर यांनी आवर्जून सांगितलं.

त्यामुळे मनसे सुरक्षेच्या निर्णयाबाबत न्यायालयात जाणार नाही हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या