fbpx

कॉंग्रेसच्या मिलिंद देवरांना मिळणार मनसेची ताकत

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढता पाय घेतला असला तरी राज ठाकरे राज्यातल्या प्रमुख मतदार संघांमध्ये जावून पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात प्रचार करत आहेत. कॉंग्रेस राष्ट्रवादीला थेट मदत करण्याऐवजी राज्यभरात सभा घेऊन जनमत आघाडीच्या बाजूने वळवताना पहायला मिळत आहेत.

शिवसेना -भाजपवर सडकून टीका करणाऱ्या मनसेने यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांना सहकार्य करण्याचे धोरण स्वीकारले आहे. मनसेच्या मतांचा आता थेट फायदा आघाडीच्या उमेदवारांना होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघात मनसेची ताकत आहे. आता या मतदारसंघात मनसेचा उमेदवार नसल्याने या मतदारसंघात मनसे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना मदत करेल अशी शक्यता आहे. कारण नुकतीच देवरा यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघातील मनसे कार्यालयाच्या शाखेला भेट दिली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मिलिंद देवरा यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.

यावेळी कार्यकर्त्यांनी मनसे-काँग्रेसच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. मिलिंद देवरा यांच्या प्रचार रॅलीत मनसे कार्यकर्त्यांनी सहभाग घेत त्यांना मतदान करण्याचे आवाहन परिसरातील जनतेला केले. यासर्व प्रकारामुळे मिलिंद देवरांना मनसेची रसद मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. नरेंद्र मोदी व अमित शहा हे देशाच्या हितादृष्टीने घातक असल्याचे सांगत त्यांना हटविण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी घेतला आहे. लोकसभेला ते आघाडीसोबत नाहीत, विधानसभेला त्यांच्याशी चर्चा होऊ शकते,असे संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिले आहेत.