मुंबई : राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येत जाणार असल्याचे जाहीर केले होते. पण अयोध्या दौऱ्याच्या १५ दिवस आधी २० मे रोजी राज ठाकरे यांनी ट्विट करून अयोध्या दौरा तूर्तास पुढे ढकलल्याती माहिती दिली. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलल्यानंतर अनेक प्रकारच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 22 मे रोजी पुण्यातील एका जाहीर सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी दावा केला की, भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी अयोध्या भेटीची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी विरोध सुरू केला. यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. मात्र रसद कुणी पुरवली हे राज ठाकरेंनी सांगितले नव्हते.
दरम्यान, आज (मंगळवार) ब्रिजभूषण शरण सिंह आणि शरद पवार यांचे साडेतीन वर्षे जुने फोटो मनसेने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबत ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाला खत-पाणी देण्याचे काम राष्ट्रवादी करत असल्याचा आरोपही करण्यात आला. मनसेचे नेते गजानन काळे यांनी याबाबत ट्विट केले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले, “राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खासदार ब्रिजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये.”
“राहिला प्रश्न शरद पवार साहेब आणि ब्रिजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा, तर शरद पवार हे अनेक वर्षे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि ब्रिजभूषण सिंह हे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळं संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल”, असा खोचक टोला रोहित पवारांनी मनसेला लगावला आहे.
मनसे नेते गजानन काळेंचे ट्विट
मनसे नेते गजानन काळे यांनी सोशल मीडियावर तीन फोटो ट्विट केले आहेत. या तिन्ही फोटोंमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अध्यक्ष शरद पवार ब्रिजमोहन सिंग यांच्यासोबत दिसत आहेत. महाराष्ट्रातील मावळ परिसरात झालेल्या कुस्ती स्पर्धेदरम्यान हे छायाचित्र काढण्यात आले आहे. ही छायाचित्रे केव्हा घेण्यात आली हे स्पष्ट झालेले नसले तरी. या फोटोच्या माध्यमातून मनसेने शरद पवारांचा खरपूस समाचार घेत लिहिले की, “ब्रिजचे निर्माते … सुज्ञास अधिक सांगणे न लगे … (फोटो झूम करून पाहावा…)”
"ब्रिज" चे निर्माते … सुज्ञास अधिक सांगणे न लगे …
( फोटो झूम करून पाहावा…) pic.twitter.com/oYQZnMbM7Y
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 24, 2022
फोटो झूम करून पाहिले असता फोटोत ब्रिजभूषण आणि शरद पवारच दिसतील. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारी व्यक्ती आणि कट रचणारी व्यक्ती शरद पवार असल्याचं मनसेनं लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या :