fbpx

जाणून घ्या निलंग्यात मनसेने आपल्याच कार्यकर्त्याला का घातली सांडपाण्याने अंघोळ ?

निलंगा(प्रतिनिधी): तालुक्यातील ग्रामीण भागात दुष्काळी उपाय योजना करण्यात सरकार सपशेल अपयशी झाल्याच्या निषेधार्थ मनसेच्यावतीने शनिवारी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्याला चक्क सांडपाण्याने ‘स्नान’ घालून अभिनव गांधीगिरी आंदोलन करुन सरकार व प्रशासनाचा निषेध नोंदविला. मागील काही दिवसापासून तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी व जनावराच्या चा-याचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे.

‘घागरभर’पाण्यासाठी अबाल वृध्दांसह महिलांना मोठी पायपीट करावी लागत असल्याचे विदारक चिञ ग्रामीण भागातील अनेक गावांमधून पाहायला मिळत आहे.राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या ‘हलगरा’या गावात तर पाणी टंचाईने रौद्र रुप धारण केले आहे.या हलगरा येथे आडातून घागरभर पाणी काढण्यासाठी ग्रामस्थांना अक्षरशः जीव मुठीत घ्यावे लागत आहे.पाणी टंचाई बरोबरच जनावराच्या चा-याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाल्याने पोटच्या लेकरांप्रमाणे जपलेली जनावरे कशी जगवायची असा यक्ष प्रश्न पशूपालकांसमोर उभा ठाकला आहे.तालुक्यातील या भयावह दुष्काळी परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात याबाबत संबंधित प्रशासनास मनसेकडून वेळोवेळी निवेदने देवून देखील सरकार व प्रशासनाकडून याबाबत कसल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.त्यामुळे गेंड्याची कातडी परिधान केलेल्या या प्रशासनाला जागे करण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष डाँ.नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन छेडण्यात आले.यावेळी सुरज पटेल,शरीफ शेख,विजय वाघमारे,अलीम पटेल,बालाजी खोमणे,नवाज पठाण,राजेंद्र लोंढे,अलीम शेख,प्रमोद जाधव,इम्रान शेख,तुकाराम भंडे,नवाज पठाण,किरण गोमसाळे,दीपक भोसले,दत्तू धुमाळ,प्रमोद जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

…तर पालकमंञी निलंगेकर यांना मतदारसंघात फिरकू देणार नाही

मुख्यमंञी फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या हलगरा या गावाबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीवर शासनाने तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना न केल्यास जिल्ह्याचे पालकमंञी संभाजीराव पाटील यांना मनसेच्यावतीने घेराव घालू.एवढेच नव्हे तर ना.पाटील यांना निलंगा विधानसभा मतदारसंघात फिरकू देणार नसल्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष डाँ.भिकाणे यांनी यावेळी बोलताना दिला.पालकमंञ्याचे प्रशासनावर अजिबात वचक नसल्यामुळे अनेक अधिकारी निर्ढावले आहेत.त्यामुळेच या मतदारसंघात पाणी व चा-याचा प्रश्न बिकट झाल्याचा आरोप डाँ. भिकाणे यांनी यावेळी बोलताना केला.