वाहतूक पोलीस फेरीवाल्याकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ पोस्ट करत मनसेने केला भ्रष्ट यंत्रणेचा भांडाफोड

राज ठाकरे

मुंबई – मुंबईच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांचे वर्चस्व दिसून येते. रस्ता, फुटपाथ असो वा उड्डाणपुलाखालील जागा प्रत्येक ठिकाणी फेरीवाल्यांचा बोलबाला आहे. फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर कुजलेल्या भाजीपाल्याची दुर्गंधी पसरते. बेकायदा फेरीवाल्यांबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार करताच कारवाईचा आव आणला जातो.परंतु प्रत्यक्षात तोंडदेखली कारवाई होते. कारवाईवेळी फेरीवाले तरी गायब होतात किंवा इतर वेळी अधिकारी, कर्मचारी गायब असतात असेच चित्र पाहायला मिळते.

अर्थात, फेरीवाले गायब होण्यामागे फेरीवाले व महापालिकेचे साटेलोटे आहे हे जगजाहीर आहे. मात्र आता वाहतूक पोलीस देखील या अभद्र युतीचा हिस्सा झालेत. पैशाच्या लालसेपोटी फेरीवाल्यांना महापालिका अधिका-यांचे अभय असल्याचे स्पष्ट मत सामान्य मुंबईकर व्यक्त करत आहे.

फेरीवाल्यांकडून न चुकता हफ्ता वसूल करणा-या पोलिस यंत्रणेलाही जबाबदार धरले जात आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत फेसबुक अकौंटंवरून वाहतूक पोलिसांचे आणि फेरीवालांचे साटेलोटे उघडे पडणारा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये वाहतूक पोलीस फेरीवाल्याकडून पैसे घेताना दिसत आहे असा आरोप मनसेने केला आहे.

दरम्यान, ठाणे महापालिकेच्या अधिकारी कल्पना पिंगळे यांच्यावर फेरीवाल्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर अनधिकृत फेरीवाल्याचा प्रश्न ऐरणीवर असताना या फेरीवाल्यांना पोलिसांनी अभय देणे हि बाब नक्कीच भूषणावह नाही. या सर्व प्रकारावरून आता सामान्य जनतेकडून मोठा संताप व्यक्त होऊ लागला आहे.

दरम्यान, महापालिका व पोलिस यंत्रणेला लागलेली भ्रष्टाचराची कीड फेरीवाल्यांना अभय देत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. यामुळेच फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नाही. भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट होत नाही, तोपर्यंत बेकायदेशीर फेरीवाल्यांचा बोलबाला राहणार आणि याला संबंधित यंत्रणाच जबाबदार आहे हे मात्र नक्की.

महत्वाच्या बातम्या :