“पुणेकरांचे पाणी आयपीएलसाठी दिल्यास मनसेचा विरोध ”

Water-Crisis-IPL

पुणे – मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार? असा सवाल करत मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले असताना आता मनसेने या वादात उडी घेतली असून पुणेकरांचे पाणी आयपीएलसाठी दिल्यास मनसेचा विरोध असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले आहे.

पुण्यातील गहुंजे स्टेडियमला चेन्नईत रद्द झालेले सामने पुण्यात हलवण्याचा आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने निर्णय घेतला. तामिळनाडूत पेटलेल्या कावेरी पाणी वाटपावरून चेन्नई सुपरकिंग्सचे घरच्या मैदानातील सर्व सामने अचानकपणे रद्द करण्यात आले होते.

काय म्हटलं आहे मनसेने प्रसिद्धी पत्रकात

पुण्यातील गहुंजे स्टेडियमला चेन्नईत रद्द झालेले सामने पुण्यात हलवण्याचा आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने निर्णय घेतला आहे. यामागे तामिळनाडूत पेटलेल्या कावेरी पाणी वाटपाचा विषय आहे.महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याला विरोध करत एका स्वयंसेवी संस्थेने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.

मुंबईतले सामने होण्यासाठी महानगरपालिकेकडून पाणी विकत घेण्याची तयारी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने केली आहे. जर पुण्यामध्ये अशा प्रकारचे सामने होणार असतील आणि त्यासाठी पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणप्रणालीतील पाणीसाठा वापरला जाणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा याला विरोध असेल..!

कारण गेले २ आठवडे पाणी कपाती बाबतचे संकेत राज्यकर्ते व शासन यंत्रणा पुणेकरांना देत आहेत. दर गुरुवारी अघोषित पाणी बंदी पुणेकर सोसत आहेत, अशा परिस्थितीत पुणेकरांचे पाणी पळवण्याचा विचार झाल्यास त्याला मनसेचा तीव्र विरोध राहील.