‘पीएम नरेंद्र मोदी’ प्रदर्शित झाल्यास खळ्ळ-खट्यॅक

टीम महराष्ट्र देशा- आगामी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भाजपविरोधी काम करण्याचे आदेश दिले आहेत. आता ५ एप्रिल रोजी अभिनेता विवेक ओबेरॉय याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने जोरदार विरोध सुरु केला आहे. राष्ट्रवादी,कॉंग्रेस,डीएमके आणि आता मनसेने या सिनेमाला विरोध केल्याने या सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग आणखी खडतर झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचं पालन सर्वांनी करावं, असं अपेक्षित असताना सत्ताधारी पक्षच जर आचारसंहितेला असे पायदळी तुडवणार असेल तर हा गैरप्रकार रोखण्यासाठी मनसेला खळ्ळ-खट्यॅक करावं लागेल, असा इशाराच संघटनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या शालिनी ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेला डावलून प्रदर्शित होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील ‘पीएम नरेंद्र मोदी ‘ या बायोपिकला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागानेसुद्धा तीव्र विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य -कला -सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी आज पुण्यात पत्रकाद्वारे हा इशारा दिला .Loading…
Loading...