१३ तारखेच्या आत पाट्या मराठीत लावा, अन्यथा पुन्हा खळ्ळखट्याक; मनसेचा इशारा

raj-thackeray

सोलापुर: शहरातील प्रत्येक दुकानावर मराठीतूनच पाट्या असल्या पाहिजेत. इंग्रजीत दिसून आल्या तर मनसे स्टाइलने ‘खळ्ळखट्याक’ करण्याचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष अक्षय आडम यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम उघडण्यात आली. त्यासाठी १३ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. त्याच्या आत इंग्रजीतल्या पाट्या बदलल्या नाहीत तर होणाऱ्या नुकसानीस मनसे कार्यकर्ते जबाबदार राहणार नाहीत, असे आडम म्हणाले.

मराठी भाषा अन् मराठी माणूस हा महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे. या दोन्ही घटकांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम मनसे करते. कुठल्याही क्षेत्रात मराठी माणूस पुढे असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करताना राज ठाकरे यांनी परप्रांतीयांचे अतिक्रमण चालू देणार नाही, असा इशारा दिला. मराठीचा अभिमान बाळगण्यासाठी सर्वत्र मराठीतूनच फलक पाहिजेत. जे लावणार नाहीत, त्यांना मनसेची भाषा शिकवा, असे ठाकरे म्हणाले. त्यानुसार ही मोहीम असल्याचे ते म्हणाले.

पहिल्यांदा नम्र निवेदने

बाजारपेठांमध्ये मोठी दालने आहेत. मराठी ग्राहकांच्या पैशावर ते चालतात. परंतु तेथील व्यापाऱ्यांना मराठीचा अभिमान नाही. त्यांनी दालनांची नावे इंग्रजीत लिहिली. पहिल्यांदा नम्र निवेदने देऊ. १३ डिसेंबरपर्यंत पाट्या बदलण्यास सांगू. ऐकले नाही तर पुढे काहीही होऊ शकते,असे निवेदनात म्हटले आहे.

मराठी हाच श्वास

सोलापूर हे बहु भाषिक शहर आहे. या शहरामध्ये तेलुगु, कन्नड, गुजराती आदी अनेक भाषा बोलल्या जातात. परंतु त्यांचे उद्योग-व्यापार हे मराठीतूनच चालतात. आपल्या सोलापुरात बहुभाषिक समाजघटक मराठीशी एकरूप झाल्याचे दिसून येते. पण, काही बडे व्यापारी मात्र मराठीला दुय्यम स्थान देत असल्याचे दिसून येते. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ही बाब मनसे कदापि खपवून घेणार नाही. मराठी ही महाराष्ट्राची मायबोली आहे. मराठीबद्दल अभिमान असणे आवश्यक आहेच. मराठी पाट्या लावल्यास त्यासाठी मनसे काहीही करू शकते, असे मनसे विभाग अध्यक्ष अक्षय आडम म्हणाले.