मनसेच्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

मुंबई : राज्यात कोरोना ग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यसरकार मोठ्या प्रमाणत उपाय योजना राबवत आहे. कल्याण-डोंबिवली परिसरामध्ये करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. पाटील यांनीच ही माहिती ट्विटवरुन दिली आहे.

कल्याण-डोंबिवलीमधील करोनाग्रस्तांची संख्या आठवर पोहचली आहे. अशातच कोरोनाग्रस्त रुग्णाने सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावल्यामुळे या परिसरात भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे.तसेच शहराच्या महापौर विनिता राणे यांनाही करोनाग्रस्त रुग्ण उपस्थित असलेल्या लग्नाला लावलेल्या हजेरीमुळे त्यानाही १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइनमध्ये राहण्याच्या सूचना पालिकेच्या आरोग्य विभागाने केल्या आहेत. एकंदरीतच कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता शहरामध्ये खासगी लॅबला कोरोना चाचणी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

त्याचप्रमाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोना चाचणीसाठी लॅब उपलब्ध नाही. कोरोना संशयितांचे चाचणीसाठी मुंबई , ठाणे, नवी मुंबई येथील लॅबमधेय पाठविले जातात. मात्र या लॅबमध्ये आधीच टेस्टिंग पेशंट जास्त असल्याने रिपोर्ट्स येण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. त्यामुळेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता येथे करोना तपासणी लॅब असणे आवश्यक असल्याचे, राजू पाटील यांनी आपल्या पत्रात म्हंटलं आहे. शहरातील खासगी लॅबला कोरोना तपासणीची परवानगी द्यावी, अशी विनंती राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे परदेशातून कल्याण-डोंबिवलीमधील आलेला हा तरुण सार्वजनिक कार्यक्रमामध्येही हजर होता. अशी माहिती समोर आल्यानंतर या तरुणाच्या गैरजबाबदार वागण्यामुळे महापालिका यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये हा तरुण डोंबिवलीमधील ज्या ज्या भागांमध्ये जाऊन आला आहे तिथे महापालिकेच्या मार्फत फवारणी केली जात आहे. तसेच हा तरुण राहत असलेल्या आणि तो ज्यांच्या संपर्कात आला आहे अशा लोकांची तपासणी केली जात आहे.

हेही पहा –