मनसेने शिवसेनेचा ‘वीरप्पन गँग’ म्हणून केला उल्लेख; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे वारे वाहू लागले आहे. असे असतांनाच राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मनसे म्हणजे भाजपची सी टीम असल्याचा उल्लेख केला. आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे भाजपची सी टीम असल्याचा उल्लेख केला. दरम्यान, आदित्य यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेचा ‘वीरप्पन गँग’ म्हणून उल्लेख केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संदीप देशपांडे म्हणाले की,‘मला वाटते की शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे.ज्या पद्धतीने ही विरप्पन गँग महानगरपालिकेमध्ये सक्रीय आहे, त्यांना आता हजारो कोटी रुपयांचा हिशोब ईडीला द्यायचा आहे. त्यानुसार कुठे कुठे पैसे खाल्ले याचा हिशोब त्यांनी ईडीला द्यावा. आमच्याबद्दल बोलण्याची काहीच गरज नाही’, असे देशपांडे म्हणाले.

दरम्यान, यापूर्वी देखील संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा ‘वीरप्पन गँग’ म्हणून उल्लेख केला होता.‘वीरप्पनने लोकांना लुटले नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटले आहे. मुंबई महापालिकेत वीरप्पन गँग कार्यरत असून या गँगने महापालिकेची भरमसाठ लूट चालवली आहे. अनेक घोटाळे केले जात आहेत. स्थायी समितीची कामेही याच गँगला दिली जात आहेत. आता अशा गँगचा एन्काउण्टर करावाच लागेल. यासाठी मनसे पुढाकार घेईन,’ असे देशपांडे म्हणाले होते. तद्पश्चात आता पुन्हा एकदा मनसेकडून अशी टीका झाल्याने शिवसेनेच्या नेत्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या