निवडणुकीपूर्वी प्रत्यक्ष बांधावर जाणारे उद्धवजी आता आभासी पद्धतीने बांधावर जात आहेत : मनसे

uddhav thackeray

मुंबई- परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत मात्र तरीही लोकांमध्ये नाराजी वाढतच आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडून राज्याचा दौरा करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.निवडणुकीपूर्वी प्रत्यक्ष बांधावर जाणारे उद्धव ठाकरे आता आभासी पद्धतीने बांधावर जात आहेत. उद्या जनतेनेही तुम्हाला प्रत्यक्ष मुख्यमंत्री न मानता आभासी मुख्यमंत्री मानलं तर, अशी खरमरीत टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाचा प्रत्यक्ष दौरा करावा. त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. वादळी पावसाने महाराष्ट्राला झोडून काढल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे साठवलेले अन्नधान्य भिजले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापैकी काही भागांचा दौरा करावा. जेणेकरून येथील लोकांना दिलासा मिळेल. तसेच आपातकालीन व्यवस्थापनासोबत तातडीने बैठक घेऊन काय मदत करणार, हेदेखील जाहीर करावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-