‘समोर येऊन बघा.. मग बघू कसे सण साजरे होत नाहीत?’, मनसेचा थेट इशारा

raj thackeray - uddhav thackeray

मुंबई : राज्य शासनाकडून सार्वजनिक दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली असून आयोजक आणि मंडळांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यानंतर आता सरकारच्या या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कमालीची आक्रमक झाली आहे.

मनसे नेते अविनाश जाधव यांनी ‘समोर येऊन बघा.. मग बघू कसे सण साजरे होत नाहीत ?’ असा थेट इशाराच दिला आहे. ‘हिंदुविरोधी सरकारने जाहीरपणे आपण हिंदू सणांविरोधात आहोत हे जनतेला सांगावं.. तुम्हाला मेळावे, यात्रा, पक्षाचे कार्यक्रम चालतात मग दहीहंडी का नको? पोलिसांना प्रत्येक वेळी पुढे करून दडपशाही करण्यापेक्षा समोर येऊन बघा.. मग बघू कसे सण साजरे होत नाहीत?’ असे अविनाश जाधव म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारने सुद्धा सण, उत्सव साजरे करू नये, असे आदेश दिले आहे. पण, तरीही मनसेनं दहीहंडी उत्सव साजरा करणारच असा पवित्रा घेतला आहे. कलम 149 प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावून देखील मनसे आपल्याला मतावर ठाम असून मनसेने ठाण्यात दहिहंडी उत्सवाची तयारी केली  आहे.

तर, कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्य सचिवांना एका पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रात संसर्ग कमी होत असला तरी काही जिल्ह्यांत पॉझिटीव्हिटी दर आणि कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्राने ही सूचना केली आहे.

महत्वाच्या बातम्या