fbpx

राधाकृष्ण विखेंच्या मंत्रीपदावरून मनसेची बोचरी टीका

टीम महाराष्ट्र देशा : राधाकृष्ण विखे पाटील यांची काल रविवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात कॅबीनेट मंत्रीपदी वर्णी लागली, त्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेने त्यांच्यावर निशाणा साधला. राधाकृष्ण विखेंच्या भाजपात जाण्याने स्वार्थही ओशाळला असेल, अशी टीका मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी केली आहे.

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. तसेच विखे यांना मंत्रिपद दिले जाणार असल्याचीही चर्चा होती. अखेर त्याला मुहूर्त लागला असून काल रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारत विखे पाटील यांना कॅबीनेट मंत्रीपद देण्यात आले. विखे यांनी काल कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. विखे यांना गृहनिर्माण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विरोधकांकडून विखेंवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. यचदरम्यान राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही निशाणा साधला आहे.

पावणेपाच वर्ष विरोधी पक्षनेतेपदावर राहून सत्ताधाऱ्यांना सोयीस्कर राजकारण करणं, नंतर ऐन निवडणुकीच्या आधी मुलाला पक्षात पाठवून नंतर आपणच मंत्रीपद पदरात पाडून घेणं ह्यानं स्वत: स्वार्थही ओशाळला असेल, महाराष्ट्राबरोबर. अशी टीका मनसे नेते अनिल शिदोरे यांनी केली आहे.