ठरल तर मगं, कॉंग्रेस आघाडीमध्ये मनसे सामील ?

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात आता काही दिवसातच  विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु होणार आहे. त्यामुळे राज्यातील भाजप- सेना युती  विरोधी  राजकीय पक्षांनी एकत्र येत आघाडी केली आहे. या आघाडीमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्ष पहिल्या पासून होताच तर आता मनसे देखील या आघाडी मध्ये सामील होणार आहे. तसेच कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मनसेला आघाडीत घेण्याच्या दृष्टीने गाठीभेटी सुरु केल्या असून दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा सुरु असल्याच दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेसला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आता काही झाली तरी कॉंग्रेसचे अस्तित्व बाधित ठेवण्यासाठी कॉंग्रेस आघाडीने राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यातील भाजप- सेना युतीची ताकद पाहता विधानसभेत शह देण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद पुरेशी नसल्याने मनसे आणि वंचित आघाडील  कॉंग्रेस आघाडीमध्ये  सहभागी करून घेण्याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मनसेला महाआघाडीमध्ये सामील करण्यास विरोध केला होता, परंतु आता विधानसभेच्या तोंडावर मोदीविरोधकांची एकजूट बांधण्यासाठी मनसेला सोबत घेणार असल्यच दिसत आहे.तसेच काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी देखील दिल्लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेतली होती.

त्यामुळे या भेटीत मनसेला आघाडीत सहभागी करून घेण्याची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. शहरी भागात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी मजबूत स्थितीत नसल्याचा राष्ट्रवादीचा अंदाज आहे. तर मनसेची ताकद मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यासारख्या शहरांमध्ये चांगली आहे. त्यामुळे मनसे आघाडीत आली तर याचा फायदा कॉंग्रेस आघाडीला शहरी भागात होणार आहे.