पुण्यात उमेदवारी नाकारली गायकवाडांना, उकळ्या फुटल्या मनसेला… पण का ?

mns banner about pune loksabha

टीम महाराष्ट्र देशा: पुणे लोकसभेसाठी कॉंग्रेसकडून पक्षाचे जेष्ठ नेते मोहन जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना डच्चू देण्यात आला आहे. गायकवाड यांनी मागील आठवड्यात कॉंग्रेस नेतृत्वावर केलेली टीका त्यांना भोवल्याच दिसत आहे. तर दुसरीकडे गायकवाडांना उमेदवारी नाकारल्याने पुणे शहर मनसेला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत.

शरद पवारांचे शिष्य म्हणून ओळखले जाणारे प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून कॉंग्रेस उमेदवारी मिळण्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. खुद्द शरद पवार यांनी गायकवाडांसाठी कॉंग्रेस दरबारी शब्द टाकल्याचं सांगण्यात येत होत. अनेक दिवस वेटिंगवर राहून देखील कॉंग्रेस नेत्यांकडून कोणतीच बोलणी न झाल्याने संयमाचा बांध सुटलेल्या गायकवाड यांनी थेट कॉंग्रेस पक्ष नेतृत्वावरच टीका केली. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरसाठी वेळ असणाऱ्या कॉंग्रेसला आपल्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यासाठी वेळ नसल्याचं गायकवाड यावेळी म्हणाले होते.

दरम्यान, गायकवाड यांनी टीका करतातच खडबडून जागे झालेल्या कॉंग्रेसने त्यांना पक्ष प्रवेश दिला. आता पक्ष प्रवेश झाला म्हंटल्यावर शीघ्र प्रतिक्रिया देणारे गायकवाड शांत बसतील तर नवलचं. लाल महालात कार्यकर्त्यांची बैठक घेत, आता पुण्याचा कारभार शनिवारवाड्यातून नाही तर लाल महालातून चालेले अशी गर्जना त्यांनी केली. दरम्यान काही माध्यमांशी बोलताना ‘आपल्याला उमेदवारी मिळाल्यास मनसे देखील पाठींबा देईल, तसेच स्वतः राज ठाकरे पुण्यात सभा घेतील’, असा विश्वास गायकवाड यांनी बोलून दाखवला.

गायकवाड यांच्याकडून मनसेला गृहीत घरून करण्यात आलेले विधान मनसेतील स्थानिक नेत्यांना रुचले नाही. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून काम करत असताना गायकवाड यांनी बाबासाहेब पुरंदरे, एक विशिष्ट  समाज, तसेच इतर विषयांवरून केलेली जातीयवादी विधाने मनसेला आवडणारी नाहीत. त्यामुळे मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पत्रक काढत, ‘ जातीय तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजू इच्छिणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी मनसे पक्ष अथवा मनसे अध्यक्ष .राजसाहेब ठाकरे यांचे नाव घेत माध्यमांशी वक्तव्य करू नये. म्हंटले होते.

दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा कॉंग्रेसकडून मोहन जोशी यांचे नाव जाहीर करण्यात आले, त्यामुळे मनसेच्या इशाऱ्यामुळे कॉंग्रेसने गायकवाडांना उमेदवारी नाकरण्यात आल्याचे म्हणत ‘मनसे इम्पॅक्ट’चे मेसेज सोशल मिडीयावर फॉरवर्ड केले जात आहेत.