ए.टी.एम मध्ये खडखडाट : मनसेने केली ए.टी.एम ची हार, हळद – कुंकू वाहून पूजा

blank

पुणे- ए.टी.एम मधील अघोषित नोटबंदी विरोधात मनसे आक्रमक झाली असून शहरातील विविध भागातील ए.टी.एम ला हार, हळद – कुंकू वाहून पूजा करीत पूजा करण्याचे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. नुकत्याच होऊ घातलेल्या कर्नाटक राज्यातील निवडणुकामध्ये या नोटा वळवण्यात आल्या का असा आरोप मनसेने केला आहे.

देशभरातील चलन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना काल आणि आज मोठ्या प्रमाणावर ए.टी.एम बंद असल्याचा अनुभव आला. या संदर्भातील जनभावना लक्षात घेत मनसेने सकाळपासूनच शहरभर मोहीम राबवत ए.टी.एम सेंटर कुठे कुठे बंद आहेत यांची माहिती घेतली यात शहरातील बहुसंख्य ए.टी.एम नोटा अभावी बंद असल्याचे आढळून आले आहे.

मनसेने शहरातील विविध भागातील ए.टी.एम ला हार, हळद – कुंकू वाहून पूजा करीत पूजा करण्याचे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरात विविध ठिकाणी आज आंदोलने झाली. यावेळी वसंत मोरे, साईनाथ बाबर, रुपाली पाटील, प्रल्हाद गवळी, सुधीर धावडे, प्रशांत मते, सुनील कदम, मंगेश रासकर, अभिजित यनपुरे व अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.