अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उधळून लावण्याची मनसेची धमकी

यवतमाळ : साहित्य संमेलन आणि वाद हे तसं जुनंच नात आहे. वादाची हीच परंपरा यावर्षी देखील कायम राहणार अशी स्पष्ट चिन्ह दिसू लागली आहेत. यवतमाळमध्ये होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर संकटाचे ढग जमा होऊ लागले आहेत.

या संमेलनांचे उद्घाटन इंग्रजीच्या ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार आहे. मराठी साहित्य संमेलनात इंग्रजी साहित्यिकांच्या हस्ते उद्घाटन कशाला असे म्हणत मराठी साहित्यिकांच्या हस्ते जर या संमेलनाचे उद्घाटन होत नसेल तर हे मराठी साहित्य संमेलन उधळून लावण्याची धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आली आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी ही धमकी दिली आहे.

मराठी साहित्यिक राज्यात आणि देशभरात आहेत. त्यांचे साहित्य देशभरात वाचले जात आहे. असे असतांना मात्र मराठी साहित्य संमेलनात इंग्रजीच्या साहित्यिकाच्या हस्ते उद्घाटन कशाला ? मराठी साहित्यिकांना का डावलले जात आहे या संमेलनात मराठी साहित्यिकांच्या हस्ते उदघाटन झाले तरच संमेलन होईल. अन्यथा हे साहित्य संमेलन उधळून लावू .