स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका आणि अभिनेता किरण माने सध्या जोरदार चर्चेत आहेत. राजकीय भूमिका मांडल्यामुळे मला मालिकेतून काढण्यात आल्याचे किरण माने (Actor Kiran Mane) यांनी म्हटले होते. माने यांच्या लिखाणशैलीमुळे यापूर्वीही अनेक चर्चा झाल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी केलेली एक पोस्ट चांगलीच गाजली. स्टार प्रवाहच्या भूमिकेवर राजकीय क्षेत्रातील नेत्यांनीही टीका केली आहे. दरम्यान आता या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. किरण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता मनसे किरण माने यांच्या विरोधात मैदानात उतरणार आहे.
या प्रकरणावर मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, “या प्रकरणावर मला बोलायचे नाही. किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. योग्य वेळी याबाबत आम्ही भुमिका घेऊ.”
दरम्यान यासंदर्भात स्टार प्रवाह वाहिनीने परिपत्रक जारी करत किरण माने यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. “किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. असे आरोप होणे ही दुर्दैवी बाब आहे. माने यांना मालिकेमधून काढून टाकण्याचा निर्णय मालिकेमधील अनेक सह-कलाकारांसह, विशेषतः, महिला कलाकारांशी केलेल्या गैरवर्तनामुळे घेण्यात आला. त्यांच्या सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांनी त्यांच्या सततच्या अनादरपूर्ण आणि आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध अनेक तक्रारी केल्या होत्या. माने यांना अनेक वेळा ताकीद देऊनही त्यांनी शालीनता आणि शिष्टाचाराचा भंग करत त्याच पद्धतीने वागणे सुरू ठेवले. त्यामुळे त्यांना मालिकेमधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.” असे स्टार प्रवाहने म्हटले आहे.
“तसेच आम्ही सर्व मतांचा आणि मतांचा आदर करतो. प्रत्येक व्यक्तीला त्यांचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. दरम्यान, आम्ही आमच्या कलाकारांसाठी विशेषतः महिलांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण सुनिश्चित करण्यासाठीही तितकेच वचनबद्ध आहोत.” असेही स्टार प्रवाहने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- शेतकऱ्यांना कर्जमाफी तर महिलांसाठी शक्ती कायदा आणला; हे तर ‘आपले’ सरकार- अंबादास दानवे
- “ऐतिहासिक औरंगाबादसाठी ऐतिहासिक घोषणा”; डॉ. भागवत कराडांच्या ट्विटनंतर चर्चांना उधाण..!
- ‘…म्हणूनच एसटी संपावर तोडगा नाही’; चंद्रकांत पाटलांचा आरोप
- महिलांची कुचंबणा; औरंगाबादेत नवे स्वच्छतागृह कुलूपबंद..!
- ‘नया नया पंछी ज्यादा फडफड करता है’; विजय वडेट्टीवार यांची पडळकरांवर टीका