जी.एम.तंत्रज्ञानाने विकसीत केलेले बियाणे शेतक-यांना वापरण्यास शासनाने परवानगी देण्याची मनसेची मागणी

MNS

प्रदीप मुरमे – राज्य सरकारने किडनाशकांवरील बंदी तत्काळ मागे घेवून शेतक-यांना जी.एम.तंत्रज्ञाने विकसीत केलेले बियाणे वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी लातूर मनसेचे जिल्हाध्यक्ष डाॕ.नरसिंह भिकाणे यांनी कृषीमंत्री यांच्याकडे केली आहे.

राज्यातील शेतकरी कोरोना, गडगडलेले शेतीमालाचे भाव, हमीभाव खरेदी केंद्र बंद, व्यापा-यांकडून होणारी आर्थिक लूट या सारख्या प्रकारामुळे राज्यातील शेतकरी भरडला जात असल्याने तो मोठ्या आर्थिक दुष्टचक्रात सापडला आहे.त्यातच प्रदूषणाचे कारण पुढे करुन शासनाकडून राज्यातील २७ किडनाशके बंद करण्यात आली आहेत. राज्यात १२ किटकनाशके, ७ तणनाशके तर ८ बुरशीनाशकांचा समावेश आहे. प्रदूषणाच्या कारणावरुन किडनाशकावर बंदी घातली जाते तर मग माणसाच्या जिविताला धोका करणारी दारु व प्रदूषण करणारी वाहने मात्र सरकारला कशी चालतात ? असा सवाल डाॕ.भिकाणे यांनी कृषीमंत्र्यांना दिलेल्या या निवेदनात उपस्थित केला आहे.

सरकार एकीकडे जी.एम.बियाणावर बंदी घालते तर दुसरीकडे जी.एम.तंत्रज्ञानाने विकसीत केलेल्या सोयाबीन,मोहरी व सरकीच्या तेलाच्या बिया आदी जी.एम.बियाणे असलेले परदेशातील उत्पादीत सोयाबीनचे तेल मात्र आयात करते.त्याचबरोबर परवा नागपूरजवळ शेतक-यांवर बीटी कापूस बियाणे बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य सरकार जी.एम.बियाण्यावर बंदी घालते तर परदेशात उत्पन्न वाढीसाठी शेतकरी जी.एम.बियाणे वापरतो. राज्य सरकारने याबाबीचा सखोल अभ्यास करुन जी.एम.बियाणे वापरण्यासाठी शेतक-यांना परवानगी द्यावी व किडनाशकांवरील बंदी तत्काळ उठवावी अन्यथा शेतक-यांच्या या प्रश्नासाठी मनसे रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन छेडेल असा गर्भीत इशारा मनसेच्यावतीने देण्यात आलेल्या या निवेदनात देण्यात आला आहे.

अनलॉक १ : राज्यात ३० जूनपर्यंत ‘हे’ सर्व बंदच राहणार

साहेब माझी आई… रडत-रडत फोन केला अन् उपमुख्यमंत्री मुंडे साहेबांचा ताफा थेट हॉस्पिटलमध्ये धडकला !

‘आरोग्यसेवेकडे अजूनही सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील’