नांदेड मध्ये उपचार चांगले नाहीत का? मनसेचा खोचक सवाल

ashok-chavhan

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. त्यातच आता ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. रविवारी त्यांना नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईत अशोक चव्हाण यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत.

दरम्यान,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी यावरून काही सवाल उपस्थित केले आहेत.आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात, कृपया चुकीचा अर्थ घेऊ नये.परंतु नांदेड मध्ये उपचार चांगले नाही का ? तुम्हाला तिथल्या डॉक्टरांवर विश्वास नाही का?,तेथील इतर कोरोना रुग्णांनी हाच विचार केला तर सरकार त्यांना मुंबईत जाण्याची परवानगी देईल का? ज्या मतदार संघाचे आपण प्रतिनिधित्व करतात त्यावर हा अविश्वासच आहे ना… असे अनेक प्रश्न ह्या निमित्याने समोर आलेत,ह्यावर आपणही प्रतिक्रिया विचारपूर्वक दयावी असं त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

कृपया चुकीचा अर्थ घेऊ नयेपरंतु नांदेड मध्ये उपचार चांगले नाही का? तुम्हाला तिथल्या डॉक्टरांवर विश्वास नाही का?,तेथील…

Posted by Sumit Khambekar on Monday, May 25, 2020

दरम्यान, अशोक चव्हाण यांना रुग्णवाहिकेतून मुंबईला आणलं जात असून या प्रवासासाठी १२ तास लागणार आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांच्यावरील पुढील उपचाराला सुरुवात होईल. दरम्यान, वडेवाडी नाका येथील एका खासगी रुग्णालयात श्री. चव्हाण यांना दाखल केल्याची माहिती मिळाली. रात्री तसेच सकाळी देखील कॉँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. आमदार अमर राजूरकर यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता पोलिस यंत्रणा तसेच कार्डियाक रुग्णवाहिका आली. त्यानंतर तपासणी करुन अकराच्या सुमारास पालकमंत्री अशोक चव्हाण हे रुग्णालयातून बाहेर चालत आले. त्यांनी आमदार अमर राजूरकर व इतरांशी लांबूनच चर्चा केली. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला उपस्थित असलेल्या नागरिकांना तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना हात करत आत बसले. त्यानंतर रुग्णवाहिका आणि पोलिसांचा ताफा रवाना झाला.