परतीच्या पावसाने भाजपला झोडपले.

व्यंगचित्राद्वारे राज ठाकरे यांनी साधला मोदी, शहा आणि जेटलींवर निशाना

टीम महाराष्ट्र देशा :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्रातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावरील ‘परतीचा पाऊस’ भाजपसाठी तापदायक ठरत असल्याचा टोला या व्यंगचित्राच्या माध्यमातून लगावण्यात आला आहे. राज ठाकरेंचे हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आपल्या फेसबुक पेज लाँचवेळी राज ठाकरे यांनी सोशल मीडियाचा वापर करुन सत्तेत आलेल्या भाजपाला दुटप्पी भूमिकेवरुन खडे बोल सुनावले होते. भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय अशी टीका राज ठाकरेंनी केली होती.

पंतप्रधान स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात आणि जनतेला राजा, मग राजाने सेवकाला कामचुकारीबद्दल प्रश्न विचाराचे नाहीत? आणि सोशल मीडियावर जाब विचारला म्हणून तुम्ही नागरिकांना पोलिसांकरवी नोटीसा धाडणार? पंतप्रधानांच्या फसलेल्या योजनांविषयी लिहिलं, त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि पोलिसांना जर धडाधड नोटिसा पाठवायला लावणार असाल तर मग तुम्ही पोसलेल्या लाखो ‘ट्रोल्सचं’ काय? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी विचारला होता.