fbpx

कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी राज ठाकरेंना ‘ईडी’ची नोटीस

टीम महाराष्ट्र देशा : कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

कोहिनूर सीटीएनलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपच्या कर्ज आणि ८६० कोटींच्या गुंतवणुकीचा ईडी तपास करत आहे. कोहिनूर मिल क्रमांक तीन विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठी ते ईडीच्या रडारवर होते. वर्तमानपत्रात बातम्या आल्या की मला ईडीची नोटीस आली, मला अशी कोणतीही नोटीस आली नाही. हे सगळं बहुमताच्या जोरावर सुरु आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. परंतु त्यांना आता नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी आणि शाह यांच्या विरोधात प्रचार  केला होता. त्याचबरोबर नुकतेच ईव्हीएमविरोधात विरोधकांची एकजूट करून त्यांनी आवाज उठवला आहे. त्यामुळे राज यांना ही नोटीस आली असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. परंतु राज ठाकरे किंवा मनसेकडून या वृत्ताला अद्याप काही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

दरम्यान, यापूर्वीही राष्ट्रवादीचे कोल्हापुरातील कागल येथील मोठे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर आयकर विभागानं छापा टाकला होता. यावेळीही राष्ट्रवादीने हसन मुश्रीफ यांनी पक्षांतर करण्यास नकार दिल्याने हा छापा टाकण्यात आला होता असा आरोप करण्यात आला होता.