भाजपसोबत युती केल्यास मनसेचाच फायदा; वसंत मोरेंचे सूचक विधान

भाजपसोबत युती केल्यास मनसेचाच फायदा; वसंत मोरेंचे सूचक विधान

wasant more

पुणे : आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तर या निवडणुकांत राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी देखील काही राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केलेले पहायला मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माणसे-भाजप युती होणार का? या चर्चांना जोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भाजपशी युती करावी अशी मागणी मनसेच्या पुण्यातील नेत्यांनी राज ठाकरेकडे करण्यात आली होती.

तर आता पुणे मनसेचे अध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी देखील भाजप-मनसे युती होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले कि, ‘मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग जाहीर झाल्यामुळे आम्हाला जड जाणार आहे. त्यामुळे भाजपसोबत युती झाली तर त्याचा फायदा होणार आहे.

भाजपसोबत गेलो तर सत्तेत सहभागी होऊन शहराचा विकास करता येणार आहे, मात्र, भाजपसोबत युती करायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय हा राज ठाकरे घेणार आहेत. असे स्पष्ट मत वसंत मोरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले आहे. दरम्यान आता पालघर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मनसे आणि भाजप एकत्र आले आहेत. भाजप अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी या संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आता पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी हे दोन पक्ष कोणती भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या