fbpx

पाकिस्तानी कलाकारांचा धिक्कार करा, अन्यथा मनसे स्टाईल समाचार घेतला जाईल

टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर सबंध देशात दहशतवाद्यांची निंदा केली जात आहे. पहिल्यापासून आक्रमक भूमिकेत असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा पाकिस्तान कलाकारांचा धिक्कार केला आहे. भारतीय संगीतकारांनी पाकिस्तानी गायक किंवा कलाकारांना भारतात काम देऊ नये, अन्यथा मनसे धडा शिकवेल असा इशारा मनसे सिने-विभागाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.

अमेय खोपकर यावेळी म्हणाले की , अजूनही देशातील काही म्युझिक कंपन्या पाकिस्तानी गायकांचे अल्बम्स बनवत आहेत. तसेच पाकिस्तानात गाणी रेकॉर्ड करून भारतात पाठविले जात आहेत आणि त्या गाण्यांवर भारतात प्रक्रिया होते व अल्बम्स निर्मिती केली जाते. पण आता अशा कंपन्यांनी ही कामे ताबडतोब बंद करावीत, अन्यथा त्यांचा मनसे स्टाईल समाचार घेतला जाईल, अशा कडक शब्दात खोपकर यांनी इशारा दिला आहे.

दरम्यान गुरुवारी दुपारी ३:२५ वाजता जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तब्ब्ल २०० किलो वजनाच्या स्फोटकांनी भरलेली चार चाकी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४२ जवान शाहिद झाले असून २० जवान जखमी झाले. गेल्या दोन दशकातला हा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यानंतर संबध देशात बदला घेण्याची मागणी होत आहे.