राईनपाडा घटनेचे सभागृहात तीव्र पडसाद ; धनंजय मुंंडे सरकारवर बरसले

टीम महाराष्ट्र देशा : लहान मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात पाच जणांची हत्या करण्यात आली होती. या घटनेचे राज्याभरात पडसाद उमटत असताना आज सभागृहात सुद्धा या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या घटनेवरून सरकारला चांगलाच फैलावर घेतल.

अफवा पसरवणे या प्रकारची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत सोशल मिडिया बाबत कायदा करा अशी भूमिका सुद्धा धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. एस आय टी नेमून पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा अशी मागणी सुद्धा धनंजय मुंडे यांनी केली आहे. तर माथी भडकावणाऱ्यांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचा सांगत धनंजय मुंडे यांनी गृहमंत्रालयावर देखील जोरदार ताशेरे ओढले आहेत.

पहा धनंजय मुंडे यांचे संपूर्ण भाषण 

दरम्यान, लहान मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात पाच जणांची हत्या करण्यात आली होती. रविवारी १ जुलैला राईनपाडा येथे आठवडी बाजार भरला होता. ५ लोक बाजाराच्या ठिकाणी एसटीतून उतरले होते. मुले पळवणारी टोळी बाजारात आल्याची अफवा बाजार परिसरात पसरल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला. मारहाण इतकी क्रूर आणि बेदम पद्धतीने करण्यात आली की या मारहाणीतच या सगळ्यांचा जीव गेला.

या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला होता. त्यामुळे ही घटना समोर आली. सुरुवातीला लोक त्यांना चपलांनी मारत होते. त्यानंतर काही तरुणांनी त्यांना राईनपाडा गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात डांबले आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली.