भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष आ. टिळेकरांनी खंडणी प्रकरणातील फिर्यादीचे धरले पाय !

पुणे : पन्नास लाखांची खंडणी मागतल्याप्रकरणी चर्चेत असलेले पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्यामागील अडचणींचे शुक्लकाष्ठ पाठ सोडायला तयार नाही.आमदार योगेश टिळेकर यांच्या मतदार संघात फायबर ऑप्टीकलची कामे चालू असताना धमकी आणि त्रास देत, फोनवरून पन्नास लाखाची खंडणी मागितली असल्याची फिर्याद रवींद्र बराटे यांनी दिली आहे. मात्र याच रवींद्र बराटे यांचे पाय आ. टिळेकर यांनी धरल्याचा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने टिळेकर पुन्हा चर्चेत आले आहेत.

पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकरांवर काही दिवसांपूर्वी कोंढवा बुद्रुक पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर टिळेकरांनी निवडणुकीच्या तोंडावर माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र सुरू असून, माझ्यावर दाखल झालेला गुन्हा सिद्ध झाला तर मी राजकीय संन्यास घेईल असं म्हटले होते. परंतु याप्रकरणात आता नवीन सिसिटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामध्ये आ. टिळेकर खंडणी प्रकरणातील फिर्यादीचे पाय धरताना दिसत आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?
दि. 7 ऑगस्ट ते दि. 7 सप्टेंबर दरम्यान कात्रज कोंढवा रोड या भागात फिर्यादीच्या कंपनीचे फायबर ऑप्टीक केबलचे काम चालू असताना आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि त्यांचा हस्तक गणेश कामठे यांनी वारंवार फोन करून व समक्ष भेटून त्यांच्या मतदार संघात फायबर ऑप्टीकचे काम करण्यासाठी वायर तोडणे, चोरून नेणे, धमकी देणे तसेच इत्यादी प्रकारे त्रास दिला. त्यांनी दि. 7 सप्टेंबर रोजी फोनव्दारे 50 लाखाची खंडणी मागितली आहे.

फिर्यादी कोण आहेत ?
फिर्यादी हे इ- व्हीजन टेलि. इन्ट्रा प्रा.लि. (मेंहदळे गॅरेज, एरंडवणा) येथे नोकरीस असुन ते पुणे शहरातील दक्षिण विभागात एरिया मॅनेजर म्हणुन काम करतात. कंपनीतर्फे शहरातील विविध पोलिस पोलिस ठाण्याचे इंटरनेट फायबर ऑप्टीक केबल मार्फत जोडण्याचे तसेच खासगी व्यक्ती व आय टी आय पार्क यांना शुल्क आकारून सेवा पुरविण्याचे काम केले जाते.