सिंधुदुर्गसाठी नवीन २० ते २५ एसटी गाड्या उपलब्ध करून द्या : आ.वैभव नाईक

टीम महाराष्ट्र देशा- सिंधुदुर्ग एसटी विभागात आयुमर्यादा संपलेल्या ३० ते ३२ एसटी गाड्यांपैकी १० गाडयांना भंगारात काढण्यास मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे २० ते २२ आयुमर्यादा संपलेल्या गाड्या अद्याप प्रवासी सेवेत आहेत. या आयुमर्यादा संपलेल्या गाड्या प्रवासी वाहतुकीतून थांबविण्यासाठी सिंधुदुर्ग एसटी विभागाला सुमारे २० ते २५ नवीन लालपरी गाड्यांची तातडीची आवश्यकता आहे. हि बाब कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निदर्शनास आणून देत सदर एसटी गाड्या लवकरात लवकर पुरविण्याची मागणी केली आहे.

सिंधुदुर्ग एसटी विभागात सुमारे ४५० एसटी बसेस कार्यरत आहेत. यात शिवशाही लालपरी, सेमी व मिनीबसेस अशा बसेसचा समवेश आहे.शिवसेनेच्या माध्यमातून अलीकडच्या काही महिन्यात विठाई (लालपरी)१२ गाड्या, शिवशाही ३ ,स्लीपर कोच २ अशा एकूण १७ नवीन गाड्या सिंधुदुर्ग विभागाला देण्यात आल्या.

एसटी गाड्यांची आयुर्मयादा पूर्ण झाल्यानंतर गाड्यांच्या दुरुस्तीवर करण्यात येणारा खर्च अधिक असल्याने व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने अशा गाड्या नंतर परिस्थिती पाहून स्क्रॅप मध्ये काढण्यात येतात. आयुमर्यादा संपलेल्या सुमारे २० ते २२ गाड्यांमधून अद्याप प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्यामुळे नवीन एसटी गाड्या मिळाल्यास आयुमर्यादा संपलेल्या गाड्या प्रवासी वाहतुकीतून थांबविण्यात येतील त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सिंधुदुर्ग एसटी विभागाला सुमारे २० ते २५ नवीन लालपरी गाड्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आ.वैभव नाईक यांनी केली आहे. आ. वैभव नाईक यांच्या या मागणीवर परिवहनमंत्री अनिल परब यांनी सकारात्मक चर्चा केली आहे.