fbpx

आर. आर आबांच्या पत्नीवर पाण्यासाठी नदीपात्रात उपोषण करण्याची वेळ

तासगाव – तासगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी तारेवरची कसरत करावी लागतीये. दरम्यान तालुक्यातील लोकांना पुरेश्या प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील या आरफळ कालव्यातून येरळा नदीत पाणी सोडण्याची मागणी गेल्या तीन महिन्यांपासून करत आहेत. मात्र त्यांच्या या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आल्याने, आमदार सुमनताई पाटील यांनी तासगाव तालुक्यातील येरळा नदी पात्रात आमरण उपोषण सुरू केले आहे.

१२ मेला येरळा नदी पात्रात आमरण उपोषण करण्याचा इशारा यापूर्वीच आमदार सुमनताई पाटील यांनी प्रशासनाला दिला होता. यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याचे उपसा सिंचन व व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.परंतु प्रत्यक्षात नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवाह अत्यंत छोटा असल्याने पाणी पुढे सरकू शकत नव्हते. चार दिवसांपूर्वी आमदार सुमनताई पाटील यांनी नदी पात्राची पाहणी करून पाणी आले आहे किंवा नाही याची खातरजमा केली होती. नदीपात्रात पाणी आले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शनिवार दिनांक १२ पासून आमदार सुमनताई पाटील यांनी नदीपात्रात आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला विविध संघटना व संस्था यांनी पाठिंबा दिला आहे.

1 Comment

Click here to post a comment