fbpx

दुष्काळग्रस्तांना ४ हजार ४६१ कोटी रूपयांची मदत वाटल्याचा सरकारचा दावा संशयास्पद – राष्ट्रवादी

टीम महाराष्ट्र देशा : सरकारच्या दुष्काळग्रस्तांना ४ हजार ४६१ कोटी रूपयांची मदत वाटल्याच्या दाव्यावर राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी निशाणा साधला. दुष्काळग्रस्तांना ४ हजार ४६१ कोटी रूपयांची मदत वाटल्याचा सरकारचा दावा संशयास्पद आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात दुष्काळग्रस्तांना ४ हजार ४६१ कोटी रूपयांची मदत वाटल्याचा दावा सरकारने केला. सरकारच्या या दाव्यावरून शशिकांत शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला, दुष्काळग्रस्तांना ४ हजार ४६१ कोटी रूपयांची मदत वाटल्याचा सरकारचा दावा संशयास्पद आहे. बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही थेट भरीव आर्थिक मदत मिळालेली नसून, सरकार प्रामाणिक असेल तर त्यांनी दुष्काळी मदतीच्या गावनिहाय याद्या तातडीने जाहीर कराव्यात, असे शिंदे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, राज्य सरकारने गेल्या अर्थसंकल्पात ७२ हजार पदांची मेगाभरती करण्याची घोषणा केली होती. तसेच २४ हजार शिक्षक भरती करण्याचे जाहीर केले होते. पण त्याचे पुढे काय झाले? असा सवाल करत, याबाबत यंदाच्या अर्थसंकल्पात काहीही स्पष्टता नाही, असे शिंदे यांनी म्हंटले.

याचबरोबर सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार, व्यापारी, उद्योजक, महिला, बेरोजगार, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक अशा कोणत्याही घटकाला दिलासा मिळालेला नाही. राज्याच्या महसुली उत्पन्नाच्या वाढीचा दर आणि राज्यावरील कर्जाचे प्रतिवर्षी वाढणाऱ्या व्याजाचे गुणोत्तर अधिकाधिक चिंताजनक बनत चाललेले आहे, असेही त्यांनी म्हंटले.

हा सलग तिसरा तुटीचा अर्थसंकल्प आहे. गतवर्षी सुमारे १५ हजार कोटी रूपयांच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. ही तूट यंदा २० हजार २९२ कोटींवर गेली आहे. हे सरकारच्या ‘अर्थ’शून्य व नियोजनशून्य कारभाराचे द्योतक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.