काल निकाल आज कामाला सुरुवात; आमदार समाधान आवताडे कोरोना रोखण्यासाठी मैदानात

पंढरपूर : काल पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. २०१९ विधानसभा निकालानंतर उदयास आलेल्या महाविकास आघाडी विरोधात भाजप असा सामना रंगणार असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष्य या निकालाकडे लागलं होतं. पंढरपुरात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केला आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांचा पराभव करून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा झेंडा फडकवला आहे.

दरम्यान, पंढरपुरात निवडणुकांच्या काळात झालेल्या प्रचारसभांमधील गर्दी व इतर सूट लक्षात घेता कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने वाढला असून परिस्थिती गंभीर झाली आहे. यामुळे आता राजकीय सामना संपला असला तरी कोरोना विरुद्ध सामान्यांचा लढा सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे कामाला लागले आहेत.

आज सकाळी आवताडेंनी मंगळवेढा आणि नंतर पंढरपूर येथे अधिकाऱ्यांच्या बैठक घेत कोरोना उपाययोजनांबाबत सूचना दिल्या. यावेळी ते म्हणाले, ‘काल जरी आमदार झालो असलो तरी आनंद साजरा करायचा आणि जल्लोष करायची वेळ नसून कोरोनाचे संकट वाढत चालल्याने पहिल्यांदा त्याच्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आज सकाळीपासून कामाला सुरुवात केली आहे.’

वेळ कमी, प्रश्न गंभीर !

माझ्याजवळ केवळ साडेतीन वर्षाचा कालावधी असल्याने पहिल्यांदा कोरोना संकट आणि नंतर पाणी प्रश्नासह इतर अडचणी सोडवण्यावर भर देणार आहे. जनतेचा विश्वास पूर्ण करण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडणार आहे, असं देखील समाधान आवताडे म्हणाले आहेत. दरम्यान, पंढरपूरसह मंगळवेढा भागात रुग्णांना बेड्स मिळत नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या